‘इथं’ नोंदवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी, महापालिकेने आणलं ‘हे’ अॅप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागत आहे. या टीकेनंतर जाग आलेल्या महापालिकेने मुंबईकरांच्या सोईसाठी 'MyBMC Pothole FixIt' नावाचं मोबाइल अॅप लाॅन्च केलं आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकेल. या अॅपद्वारे मुंबईकरांना महापालिकेकडं खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवता येतील. 

म्हणून यंत्रणाच बंद

साधारण ३ वर्षांपूर्वी महापालिकेने खड्डय़ांच्या तक्रारींसाठी ‘पॉट होल ट्रॅकिंग सिस्टम’ सुरू केली होती. या यंत्रणेद्वारे मुंबईकर आपल्या मोबाइलवरून खड्डय़ांचा फोटो टाकून तक्रार नोंदवत होते. परंतु त्यातून खड्डय़ांचा आकडा जाहीर होऊ लागला होता. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून  महापालिकेवर टीका होऊ लागल्याने महापालिकेने ही पद्धतच बंद केली.  

तक्रारींचा पाऊस

तेव्हापासून मुंबईकर महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमाकावर, वॉर्डनिहाय व्हाॅट्सअॅप, ट्विटर अकाऊंटवर खड्डय़ांच्या तक्रारी नोंदवत होते. महापालिकेच्या ट्विटर हँडलवर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस पडू लागल्यानंतर अखेर महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘पॉट होल ट्रॅकिंग सिस्टम’ पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

सेल्फी विथ खड्डा

या अॅपवर खड्ड्याचा फोटो काढून तक्रार नोंदवल्यावर महापालिकेकडून त्वरीत त्याची दखल घेण्यात येईल. आणि संबंधित रस्त्याचे कंत्राटदार यांच्यापर्यंत ही तक्रार पोहोचवून खड्डे बुजवण्याचं काम करण्यात येईल. 

खड्ड्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाल्याने मनसेने ‘सेल्फी विथ खड्डा’ ही मोहीम सुरू केली आहे. खड्ड्यांसोबत चांगला सेल्फी काढल्यास त्या व्यक्तिला पारितोषिक देण्यात येईल.


हेही वाचा- 

'सेल्फी विथ खड्डा', मनसे कार्यकर्त्यांची नवी मोहीम

रस्त्यांवरील खड्डे भरणं बेकायदेशीर- महापालिका


पुढील बातमी
इतर बातम्या