‘तौत्के’ चक्रीवादळ; कोरोना रुग्णालयांतील ३९५ रुग्णांचे स्थलांतर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचं चक्रीवादळ तयार झाले असून ते १५ आणि १६ मे रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे मुंबई आणि परिसरात जोरदार वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीनं महापालिकेनं यंत्रणा सुसज्ज केली असून मोठ्या कोरोना उपचार केंद्रांच्या अतिदक्षता विभागांतील ३९५ रुग्णांचे अन्य रुग्णालयांत स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

निसर्ग वादळाच्या वेळी ऐनवेळी बीकेसी कोरोना उपचार केंद्रांतील २०० हून अधिक रुग्णांचे स्थलांतर करण्याची वेळ आली. सर्वसाधारण विभागातील रुग्णांचे स्थलांतर करणं सोपे असते. परंतु अतिदक्षता विभागातील रुग्णांचे स्थलांतर करणे जोखमीचे असते. तेव्हा ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून पालिकेने मोठ्या कोरोना केंद्रांतील अतिदक्षता विभागात असणाऱ्या ३९५ रुग्णांचे अन्य रुग्णालयांत स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को करोना केंद्र, शीव रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांत पाठविण्यात येणार आहे. तसेच आता खाटांची चणचण नसल्याने शक्यतो नव्या रुग्णांना दाखल करू नये, प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना घरी पाठवावे, अशा सूचनाही पालिकेने दिल्या आहेत. त्यानुसार या केंद्रांमध्ये शुक्रवारीही नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले नाही.

भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, वरळीचे एनएससीआय, बीकेसी, नेस्को, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग या ठिकाणी असणारी कोरोना उपचार केंद्रे ही तात्पुरत्या स्वरूपात उभी करण्यात आली आहेत. वेगाने वारे वाहिल्यास झाडे किंवा फांद्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या रुग्णालयांजवळच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.

उदंचन संचांची व्यवस्था 

ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून या ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज असून हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज आणि चक्रीवादळाबाबतच्या सूचना व दक्षतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. 

धोकादायक झाडांची छाटणी

महापालिकेने संबंधित विभागांना प्रामुख्याने धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिनाऱ्याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामग्रीसह तैनात करणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.

वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी झाल्यास वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था काम करत असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच आवश्यक तेवढे इंधनही उपलब्ध करून ठेवावे. जेणेकरून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

लसीकरण बंद

संभाव्य चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने जाहीर के ले आहे.

नागरिकांना दक्षतेचा इशारा

पालिका क्षेत्रातील समुद्र किनारी असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. विभागांतील तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ करून सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या
  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
पुढील बातमी
इतर बातम्या