कचरा प्रश्न पेटणार? मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद, कांजूरमार्ग, देवनार इथं टाकणार कचरा

मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्ठात आल्यानं आणि आसपासच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अखेर मुंबई महानगरपालिकेने मुलुंड डम्पिंग ग्राउंड सोमवारी, 1 ऑक्टोबरपासून बंद केलं आहे. त्यानुसार आता मुंबईतील कचरा फक्त देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार आहे. 

दरम्यान देवनार डम्पिंग ग्राऊंडचीही क्षमता संपत आली असून नागरिकांनाही त्रास होतो आहे. त्यामुळे इथं कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध असल्याने कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

उपाययोजनांचा परिणाम

मुलुंड, देवनार आणि काजूरमार्ग या तीन डम्पिंग ग्राउंडवर मुंबईतील सर्व कचरा टाकला जातो. मुंबईत दिवसाला सात हजार पाचशे मेट्रिक टन कचरा जमा होत होता. पण पालिकेने विविध उपाययोजना करत तीनशे मेट्रिक टनने कचरा कमी केला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत सात हजार दोनशे टन कचरा जमा होतो. यातील अंदाजे दोन हजार टन कचरा 24 हेक्टरवरील मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात होता.

'डम्पिंग ग्राउंड बंद करा'

पण या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्यानं आणि कचऱ्याच्या दुर्गंधीला कंटाळलेल्या, आजारी पडणाऱ्या नागरिकांनी हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दीड-दोन वर्षांपूर्वी हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. पण डम्पिंग ग्राउंड बंद करून कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळत नव्हता. 

पालिकेला कंत्राटदार मिळाला

अखेर जूनमध्ये पालिकेला कंत्राटदार मिळाल्यानं 1 ऑक्टोबर पासून मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आलं आहे. आता 731 कोटी खर्च करत शास्त्रोक्त पद्धतीने 70 लाख मेट्रिक टन कचऱ्याचा उपसा करण्यात येणार आहे. तर आता मुंबईचा संपूर्ण कचरा देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर सोमवारी 1 ऑक्टोबर पासून टाकण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या