आता तळघरातील बांधकामे होणार सील

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कमला मिल आग दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्वच बांधकामांची आग प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत तपासणी करण्याचे आदेश दिलेले असतानाच आता तळघरातील (बेसमेंट) सर्व बाधकामांची विशेष तपासणी केली जाणार आहे. बेसमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांचा साठा किंवा लोकांच्या जीवितला धोका निर्माण होईल, अशा प्रकारची परिस्थिती आढळून आली, तर कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ही तळघरे सील केली जाणार आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हे स्पष्ट केले असून त्यानुसार बेसमेंटच्या तपासणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ज्वलनशील पदार्थांचा वापर बेकायदा

कमला मिलमधील आगीच्या दुघटनेनंतर इमारतींचे तळघर (बेसमेंट) हे आग प्रतिबंधित आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. जर बेसमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांचा साठा, दुकाने, तसेच अन्य प्रकारे बेसमेंटचा वापर केला जात असेल आणि ते अग्नी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असुरक्षित आहे, असे आढळून आल्यास अग्निशमन दलाकडून ते बेसमेंट त्वरीत सील केले जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

बेसमेंटबाबतच्या अटी पाळणं आवश्यक

बेसमेंटचा वापर कसा असावा? याबाबत विकास नियंत्रण नियमावलीतील ३८(९)नुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार बेसमेंटमध्ये वाहनतळ (कार पार्किंग), अज्वलनशील पदार्थांचा साठा, बँक लॉकर्स, साठवण टाकी आदींना परवानगी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात बेसमेंटमध्ये रेस्टोबार, पब, हॉटेल, कार्यालये, रासायनिक पदार्थांची साठवण करणारी गोदामे, दुकाने आदी थाटली आहेत. त्यामुळे बेसमेंटमध्ये असलेल्या सर्वच हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच जर डीसीआरचे आणि फायर अॅक्टचे उल्लंघन करून त्याठिकाणी बेसमेंटचा वापर होत असेल, तर त्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.


हेही वाचा

कमला मिलचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार

पुढील बातमी
इतर बातम्या