बिसलेरी कंपनीच्या अनधिकृत पावसाळी शेडवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व येथील बिसलेरी प्रा. लि. कंपनीच्या आवारातील ६ हजार ९७३ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे उभारलेल्या पावसाळी शेडवर पालिकेने कारवाई केली आहे. तसेच याच आवारात असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका 'केबिन'चंही बांधकाम अनधिकृत असल्याचं आढळून आल्याने नोटीस बजावली आहे.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

महापालिकेच्या 'के पूर्व'विभागाच्या इमारत आणि कारखाने खाते, विलेपार्ले पूर्वचे अग्निशमन केंद्र येथील संबंधित अधिकाऱ्यांनी ‘अंधेरी घाटकोपर लिंक रोड’ येथील बिसलेरी प्रा. लि. या कंपनीच्या आवाराची सोमवारी संयुक्त पाहणी केली. या पाहणीदरम्यान सदर आवारात पावसानिमित्त अनधिकृतपणे शेड उभारण्यात आल्याचे तसेच आवारातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक 'केबीन'चं बांधकाम अनधिकृतपणे केल्याचं आढळून आलं.

महापालिकेने बजावली नोटीस

पालिकेने अनधिकृत पावसाळी शेडवर तात्काळ कारवाई करत त्यावर हातोडा चालवला; तर अनधिकृत केबिनबाबत 'मुंबई महापालिका अधिनियम' कलम ३५१ अन्वये नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती ‘के पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे. परिमंडळ - ३चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत महापालिकेचे २० कामगार-कर्मचारी-अधिकारी आणि स्थानिक पोलिस या ठिकाणी कार्यरत होते. या कारवाईसाठी महापालिकेला आलेल्या खर्चाची भरपाई ही संबंधित कंपनीकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहितीही सपकाळे यांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या