सध्या बीएमसीने आधीच 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे. शहराची गरज भागवण्यासाठी राज्य सरकारच्या राखीव जलस्रोतांमधून अतिरिक्त पाणी घेतले जात आहे.
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांनी सांगितले की, सध्याचा जलसाठा आणि राखीव पाण्याचा पुरवठा लक्षात घेता मुंबईची पाण्याची गरज साधारणपणे 20 ऑगस्टपर्यंत भागवता येऊ शकते.
सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. शहर प्रशासनाच्या तयारीबाबत आणि आपत्कालीन नियोजनाबाबत नगरसेवकांनी माहिती मागितली. यावेळी बंगार यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत, एल निनोच्या प्रभावामुळे वर्षाच्या उत्तरार्धात तापमान वाढू शकते. त्यामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवनही वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
त्यांनी 2009 सालाचा संदर्भ देत सांगितले की, त्यावेळी दीर्घकालीन जलटंचाईमुळे वर्षभर पाणी कपात कायम ठेवावी लागली होती. जुलैमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी प्रशासन सध्या सावध भूमिका घेत आहे.
सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका शहरातील उंच भाग आणि शेवटच्या टोकावरील वस्त्यांना बसत आहे. कमी दाबामुळे अनेक इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यंत तसेच दूरच्या भागांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
बंगार यांनी सांगितले की, चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडूनही पाणीटंचाईच्या तक्रारी येत आहेत. यावर उपाय म्हणून प्रभावित भागांमध्ये पाण्याचे टँकर पाठविण्यात येत असून स्थानिक वितरण यंत्रणेत शक्य तितका योग्य पाणीदाब राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, जलपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बीएमसीकडून भांडुप कॉम्पलेस (Bhandup Complex) येथे दररोज 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे टॉवर स्थलांतरित करण्याच्या कामात जलपुरवठा प्रकल्प विभागाच्या अभियंत्यांनी सुमारे 7 कोटी 48 लाख रुपयांची बचत केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून पुढील काही आठवड्यांतील पाऊस आणि धरणांतील जलसाठ्याच्या स्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
हेही वाचा