अंधेरी पूर्वेकडील अंधेरी-कुर्ला रोडवर ६ इंच व्यासाची जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं. पाण्यामुळे वाहतुकीला अडथळ निर्माण झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच के/पूर्व विभागाचे देखभाल आणि जल अभियंता तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तातडीने जलवाहिनीची गळती शोधण्याचं काम सुरू केलं आहे. तातडीचा उपाय म्हणून या भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
उच्च दाबाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीचा शोध घेत असताना हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. या जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे कारंजे अक्षरश: छतापर्यंत पोहोचत होते.
या जलवाहिनीतील पाणी पुरवठा थांबवण्यात आला असून वाहतूकही सुरळीत झाली आहे. ६ इंच व्यासाच्या जलवाहिनीत गळती असल्याने हा प्रकार घडला. या जलवाहिनीची दुरुस्ती दिवसा करण्यास वाहतूक पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने रात्री हे दुरुस्तीचं काम करण्यात येईल. गळतीचा या भागातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
- अशोककुमार तावडीया, जलअभियंता, मुंबई महापालिका
हेही वाचा -
मालाडमध्ये एमएम मिठाईवाला दुकानाला मोठी आग