कोस्टल रोड प्रकल्पात ३.४५ किमीचे दोन टनेल

सागरी किनारा रोड अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता लवकरच मुंबई महानगर पालिकेकडून सुरुवात होणार आहे. पालिकेकडून राबवला जाणारा हा पहिला सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असा असणार आहे. या प्रकल्पतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कोस्टल रोडवर दोन टनेल अर्थात बोगदे असणार आहेत. 

३.४५ किमी अंतराचे बोगदे

गिरगाव ते मलबार हिलदरम्यान ३.४५ किमी अंतराचे दोन बोगदे असणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीत असणारा हा दुसरा बोगदा असणार आहे. इस्टर्न फ्री वे वरील बोगदा हा मुंबई शहरातील पहिला बोगदा आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी वांद्रे सी लिंकच्या वरळीच्या बाजूपर्यंत ९.९७ किमीचा कोस्टल रोडचा भाग असणार आहे. त्यादरम्यान येण्या-जाण्यासाठी ३.४५ किमीचे दोन बोगदे असणार आहेत. गिरगाव चौपाटीपासून या बोगद्याची सुरुवात होणार असून मलबार हिल खालून प्रियदर्शनी पार्कला येऊन हा बोगदा पूर्ण होणार आहे.

सकार्डो नोझल तंत्रज्ञानाचा वापर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा बोगदा बांधण्यात येणार आहे. तर बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठी सकार्डो नोझल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचंही माचिवाल यांनी सांगितलं आहे. तर मेट्रो ३ च्या भुयारी मार्गासाठी ज्या टीबीएम अर्थात टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जात आहे, त्याच टीबीएम मशीनचा वापर या बोगद्याच्या कामासाठी करण्यात येणार आहे. तर हा बोगदा तब्बल १२० वर्षे टिकेल असं त्याचं बांधकाम असेल, असा दावा पालिकेनं केला आहे.

२० ते २५ मीटर खोल बोगदा

११ मीटर परिघाचा, ७ मीटर उंचीचा आणि २० ते २५ मीटर खोल असा हा बोगदा असणार आहे. तर या बोगद्यात सुसज्ज अशी अग्निरोधक यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. तर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल संदेश यंत्रणा आणि डिजिटल मार्गदर्शक फलकही या बोगद्यात असणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो कोस्टल रोडवरून प्रवास करताना तुम्हाला नक्कीच गावी जातानाचा आनंद मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या