गिरगाव चौपाटीवर यंदा विसर्जन करताना मूर्तींचे फोटो काढण्यास बंदी

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करत निरोप देताना त्याची आठवण म्हणून आपण सर्व छायाचित्र काढत असतो. समुद्रात किंवा तलावांमध्ये मूर्तीचं विसर्जन करताना आपण आपल्या कॅमेराने अथवा मोबाईल फोनच्या कॅमेराने फोटे काढत असलो तरी या पुढे ती काढता येणार नाही. जर विसर्जनस्थळी आपण बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करताना आढळलात तर तुमचा कॅमेरा अथवा मोबाईल फोन जप्त केला जाणार आहे.

पोलिस,पालिकेचा निर्णय

मुंबईतही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती या मोठ्या उंचीच्या असतात. त्यामुळे अशा मोठ्या गणेश मूर्तीचं विसर्जन करताना अनेक अडचणी येतात. बऱ्याचदा मोठी भरती असेल तर समुद्रात थोड्या अंतरावर गेल्यावर मूर्ती ढकलून दिली जाते. त्यामुळे अशाप्रकारच्या व्हिडिओमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे विसर्जनस्थळी मूर्तीचं विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचं चित्रण करू न देण्याचा निर्णय मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

तर मोबाइल जप्त

गिरगावच्या समुद्र चौपाटी आणि तलाव अशाप्रकारच्या विसर्जन स्थळांवर कोणीही छायाचित्रण करू नये, अशाप्रकारचे फलक लावून भक्तांना आणि पर्यटक यांना इशारा दिला आहे. गणेश मूर्तीचं छायाचित्रण करण्यास बंदी असल्याच्या सूचना देणारे फलक विसर्जन स्थळी जागोजागी लावण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही गिरगाव चौपाटीवर फोटो काढता येणार नसून सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची पथकंही सज्ज आहेत. कोणी छायाचित्रं काढताना आढळल्यास पोलिस त्यांना हटकून काढलेले फोटो डिलीट करायला लावतील. तसंच कॅमेरा आणि मोबाईल जप्त केला जाणार असल्याची माहितीही पोलिसांकडून तसंच महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

तसे फलकही लावले

गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी असते, तसेच मोठ्या संख्येने मूर्तीचं विसर्जन होत असतं. त्यामुळे याठिकाणी छायाचित्र काढण्यास बंदी असल्याचं डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केलं. याबाबत पोलिस आणि महापालिकेच्यावतीने गिरगाव चौपाटीवर फलकही लावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या