अखेर सोमवारी होणार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेच्या (bmc) कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. गतवर्षी या कर्मचाऱ्यांना १५ हजार दिवाळी बोनस (diwali bonus) देण्यात आला असून, यंदा वाढीव बोनस देण्याची मागणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र एकमत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, आता महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यावर एकमत झाले असून, सोमवारी त्याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाविरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी किती रक्कम द्यायची यावर एकमत झालेले नाही. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ करून १५ हजार ५०० रुपये बोनस देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे (coronavirus) पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

गतवर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बोनसच्या रकमेत वाढ न करता १५ हजार रुपये द्यावे, असा एक मतप्रवाह पालिकेत आहे. त्याच वेळी किमान ५०० रुपये वाढवून १५ हजार ५०० रुपये बोनस द्यावा, असे काही अधिकारी आणि नगरसेवकांचे म्हणणे आहे. यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत एक लाख कर्मचारी आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या