डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांची आंबेडकरी अनुयायांची मागणी पूर्ण झाली आहे. बाबसाहेबांचा विविध विषयांचा मोठा व्यासंंग होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांनी परदेशात जाऊन सखोल अभ्यास केला. बाबासाहेबांचे लेखन हे बहुतांश इंग्रजीत आणि काही मराठीत आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण आणि लेखनाचे एकूण 22 खंड प्रकाशित केले आहेत. तर मल्याळम भाषेतही बाबासाहेबांच्या साहित्याचे 40 खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र बाबासाहेबांवर लिहिलेली पुस्तके वाचण्यास तरूण वर्ग तितकासा उत्साही दिसत नाही.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दादरच्या आयडियल बुक डेपोमध्ये बाबसाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, आंबेडकरांवर लिहीलेली पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत. मात्र हवा तसा प्रतिसाद पुस्तक खरेदीला नसल्याचं आयडियल बुक डेपोचे संचालक मंदार नेरूळकर यांनी सांगितले.