अतिक्रमण हटवताना सापडला ब्रिटीशकालीन दगड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परळ - पालिकेच्या एफ दक्षिण विभागाकडून शुक्रवारी परळ पूर्व येथील एस. एस. राव मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आले. हे अतिक्रमण हटवताना साधारण दोनशे वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन मैलाचा दगड सापडला आहे. या दगडाची उंची अंदाजे 4 ते 5 फूट असावी अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे. याचे जतन विभागीय पातळीवर करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ब्रिटिशांनी मुंबईत कुलाब्यापासून माहिमपर्यंत 1816 ते 1837 या काळात 16 ठिकाणी असे मैलाचे दगड लावले होते. काळा घोडा येथील थॉमस कॅथलिक चर्चजवळ शून्य मैलाचा दगड बसवण्यात आला आहे. तर माहीम कॉजवे आणि शीव किल्ल्याजवळ त्या काळातील सीमा दर्शवणारे शेवटचे मैलाचे दगड आहेत. ब्रिटीशांनी त्याकाळी क्रमांकानुसार हे दगड ठेवले आहेत त्याप्रमाणे परळमधील हा मैलाचा दगड पाचव्या क्रमांकाचा आहे. तर एफ दक्षिण विभागात असे दोन मैलाचे दगड असून त्यातील एक दगड चित्रा सिनेमागृहाजवळ आहे. महापालिकेने या दोन्ही दगडाचे जतन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मुंबईतल्या इतर मैलांच्या दगडाचे जतन करण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी चर्चा करून लवकर आराखडा तयार करण्यात येईल असे एफ दक्षिण विभाग सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या