ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीत शिरून पालिका कर्मचारी थांबवणार गळती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेच्या जी दक्षिण विभागात असलेल्या ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या दुरूस्तीसाठी महापालिकेचे कर्मचारी जलवाहिनीत प्रवेश करणार आहेत. हे काम २ व ३ डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, या कामामुळं पालिकेच्या जी दक्षिण व जी उत्तर विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. परिणामी वरळी आणि प्रभादेवी भागातील काही घरांचा पाणीपुरवठा खंडित होणार असून काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एका आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अल्ट्रासाऊंड पद्धतीनं गळतीचं ठिकाण शोधून काढलं. त्यावेळी जलवाहिनीला लागलेली गळती थांबविण्यासाठी रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं. यावेळी हे काम करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत होतं. कारण, ज्या ठिकाणी जलवाहिनी गळती लागली आहे, त्याच परिसरात मुख्य पर्जन्य जलवाहिनी, मुख्य गटार आणि वीजवाहिन्या आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांना गळतीच्या ठिकाणीपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं.

जी दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावर गावडे चौकनजीक ब्रिटिशकालीन १४५० मिलिमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीतून गळती होत असल्याचे १८ नोव्हेंबरला समोर आलं होतं. त्यावेळी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्या सहाय्यक अभियंता जलकामं (तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी) या विभागानं तांतडीनं हाती घेतलं.

पालिकेच्या जलविभागातील कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीच्या बाजूनं २ ते ३ दिवसांच्या खोदकामानंतर सुमारे २५ ते ३० फुट खोल खड्डा खणून गळतीचं ठिकाण शोधून काढलं. लाकडी पाचर ठोकून आणि त्याजागी एम. एस. पॅच स्क्रू जॅकच्या साहाय्यानं गळती रोखली. मात्र जलवाहिनीच्या पुढील भागांत आणखी मोठी दुसरी गळती सुरू असल्याचं निदर्शनास आलं. मात्र, त्या ठिकाणी कठीण पाषाण असल्यानं अधिक खोलवर खोदकाम करून गळती नियंत्रणात आणणं शक्य नव्हतं. परिणामी २ ते ३ डिसेंबरला या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेकडून हाती घेण्यात आलं आहे. २ डिसेंबरला सकाळी ८ वाजता हे काम सुरू होणार असून, ३ डिसेंबरला २ वाजता काम पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन आहे.

'अशी' होणार दुरूस्ती

  • गळतीच्या ठिकाणाजवळ दुसरा खड्डा खणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
  • खड्ड्यात माती पडू नये यासाठी खड्ड्याच्या सर्व बाजूंनी शोअरिंग प्लेट्स लावण्यात येणार आहेत. 
  • जलवाहिनीवर २४ इंचाचं दोन मॅनहोल ड्राय वेल्डिंगद्वारे बसविण्यात आले आहेत.
  • एका पंपाद्वारे जलवाहिनीतील पाण्याचा उपसा करून तिला रिकामं केलं जाणार आहे
  • दुसऱ्या मॅनहोलद्वारे पालिकेचे कर्मचारी जलवाहिनीत प्रवेश करून दुरुस्तीचं काम करणार आहेत. 
  • जलवाहिनीत प्रवेश केल्यानं किती ठिकाणी गळती सुरू आहे, याचा शोध घेणे कर्मचाऱ्यांना सोपे होणार आहे,
  • जलवाहिनीचे झालेले नुकसान निदर्शनास येईल. 
  • निदर्शनास न आलेल्या गळत्याही दुरुस्त करणं पालिकेला शक्य होणार आहे. 
  • या दुरुस्तीकामासाठी पूर्णत: आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या