मुख्यमंत्र्यांसमोरच ‘बर्निंग कार’चा थरार! ताफा थांबवून केली तरूणाची विचारपूस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावरुन मध्यरात्रीनंतर मुंबईत परतले. मात्र मुंबईमध्ये परतल्यानंतर घरच्या वाटेवर असताना त्यांना विलेपार्ले परिसरामध्ये महामार्गावरच एका तरुणाच्या गाडीला आग लागल्याचं दिसलं.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि या तरुणाची विचारपूस केली. तसेच या तरुणाला मदतीचं आश्वासनही दिलं. या साऱ्या प्रकरणाचा व्हिडीओ शिंदे गटाच्या समर्थक असणाऱ्या शितल म्हात्रे यांनी ट्वीटरवरुन शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे या तरुणाची विचारपूस करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्याला म्हणाले, “घाबरु नको. जीव वाचाला हे महत्त्वाचं आहे. गाडी आपण नवीन घेऊ. मी बोलतो,” असं सांगत धीर देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांचे हे शब्द ऐकून तरूणाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या तरुणाची विचारपूस करुन निघताना मुख्यमंत्री त्याच्यासोबत कोण आहे असं विचारल्यानंतर या तरुणासोबत एक व्यक्ती असल्याचं उपस्थित पोलीस शिंदेंना सांगतात. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, “तू गाडीच्या जवळ जाऊ नकोस बाळा” असं या तरुणाला सांगतात.

शितल म्हात्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रात्रीचे १२.३०.. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्री शिंदेंनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. हे आहेत आपले मुख्यमंत्री,” 

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे फॉर्च्युनर कारला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या