मध्य रेल्वेकडून स्थानकांवर या नवीन सुविधा उपलब्ध होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

Central Railway (CR) स्थानकांवर प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांना अधिक आरामदायी, सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी विविध सुविधा आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

जानेवारी 2026 महिन्यात मुंबई विभागाने पुरवलेल्या प्रमुख सुविधांची माहिती पुढीलप्रमाणे:

1. एस्केलेटर (Escalators):

एकूण 4 नवीन एस्केलेटर बसविण्यात आले असून त्यामध्ये कसारा रेल्वे स्टेसन येथे 2 आणि बदलापूर रेल्वे स्टेशन येथे 2 एस्केलेटरचा समावेश आहे.

2. लिफ्ट (Lifts):

एकूण 2 नवीन लिफ्ट बसविण्यात आल्या असून त्यामध्ये वागणी रेल्वे स्टेशन येथे 1 आणि बदलापूर रेल्वे स्टेशन येथे 1 लिफ्टचा समावेश आहे.

हे एस्केलेटर आणि लिफ्ट ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांगजन तसेच इतर प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. प्लॅटफॉर्म बदलताना प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ हालचाल करण्यास मदत होते.

3. BLDC पंखे:

विविध स्थानकांवर 142 नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट (BLDC) पंखे बसविण्यात आले असून 289 जुन्या BLDC पंख्यांच्या जागी नवीन पंखे बसविण्यात आले आहेत.

BLDC पंखे ब्रशलेस DC मोटरवर चालतात, जे पारंपरिक इंडक्शन मोटरपेक्षा अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि कमी आवाज निर्माण करणारे असतात. कार्बन ब्रशऐवजी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर आणि कायमस्वरूपी चुंबकांचा वापर केल्यामुळे वीज वापरात 50 ते 70 टक्क्यांपर्यंत बचत होते.

4. HVLS पंखे:

दादर रेल्वे स्टेशन येथील विविध प्लॅटफॉर्मवर 8 नवीन हाय व्हॉल्युम लो स्पीड (HVLS) पंखे बसविण्यात आले आहेत.

HVLS पंखे मोठ्या जागेत हळू गतीने मोठ्या प्रमाणात हवा फिरवून प्रभावी थंडावा आणि हवेशीर वातावरण निर्माण करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते आणि कमी खर्चात अधिक आरामदायी वातावरण उपलब्ध होते.

5. एलईडी दिवे:

विविध स्थानकांवर 362 नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले असून 1635 जुन्या एलईडी दिव्यांच्या जागी नवीन दिवे बसविण्यात आले आहेत.

हे एलईडी दिवे ऊर्जा कार्यक्षम असून त्यांचे आयुष्य जास्त असते. देखभाल आणि बदल खर्च कमी होतो. ते अधिक उजळ प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत.

6. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी डिस्प्ले बोर्ड:

लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे एकूण 4 नवीन ट्रेन डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये 2 इनडोअर आणि 2 आऊटडोअर डिस्प्ले बोर्डचा समावेश आहे.

7. नवीन उपनगरीय ट्रेन इंडिकेटर्स:

नेरूळ रेल्वे स्टेशन, पनवेल रेल्वे स्टेशन, डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन, शिवडी रेल्वे स्टेशन आणि रे रोड रेल्वे स्टेशन या स्थानकांसह विविध ठिकाणी एकूण 56 नवीन उपनगरीय इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत.

यामध्ये नेरुळ येथील फूटओव्हर ब्रिजवर 6 नवीन इंडिकेटर्सचा समावेश आहे. तसेच जुन्या इंडिकेटर्सच्या जागी नवीन इंडिकेटर्स बसवण्यात आले आहेत. हे इंडिकेटर्स अधिक आकर्षक आणि स्पष्ट माहिती देणारे आहेत.

प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव देणे हेच उद्दिष्ट ठेवून ही कामे करण्यात येत आहेत.


हेही वाचा

महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये 8 टक्क्यांनी घट

पुढील बातमी
इतर बातम्या