चिंचपोकळी पुलाची अवस्था सुधारणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या अनेक महिन्यांपासून चिंचपोकळी पुलाची अत्यंत दूरवस्था झाली होती. दुचाकीस्वरांना याचा मोठा फटका बसत होता. मात्र आता ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. मुंबई महापालिकेकडून चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम 17 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. 

काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरता चिंचपोकळी पुलावरून चिंचपोकळी जंक्शनकडे जाणारी वाहतूक ही नियमितपणे सुरू राहील. परंतु चिंचपोकळी जंक्शनकडून भायखळा वाहतूक विभागाच्या हद्दीतील परब चौकाकडे येणाऱ्या वाहनांस बंदी घालण्यात येणार आहे. चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू झाल्यावर 30 दिवसांपर्यंत एकतर्फी वाहतूक चालू ठेवण्यात येईल. 

वाहतूक सुरळीत सुरू रहावी याकरता पर्यायी मार्ग म्हणून चिंचपोकळी पुलावरून पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दादरकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून सरळ न येता एन. एम.जोशी मार्गाने शिंगटे मास्तर चौक जंक्शन येथून करी रोड पुलावरून पुढे भारतमाता जंक्शनकडून वळवण्यात आली आहे. चिंचपोकळी पुलावरून पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दक्षिण मुंबई पूर्वेकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून एन. एम.जोशी मार्गाने एस ब्रिज जंक्शन येथे येऊन एस ब्रिजवरून पूर्वेकडे वळवण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या