ठाण्यात भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे (thane) महानगरपालिकेच्या  हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 2025 या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 12 हजार 465 नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा (dog bite) घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातील सर्व जखमी नागरिकांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तसेच महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या (thane municipal corporation) आरोग्य विभागाने दिली.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात भटक्या श्वानांचा (stray dogs) त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना हे श्वान लक्ष्य करत आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, दररोज सरासरी 50 ते 60 नागरिकांवर भटक्या श्वानांकडून चावा घेतला जातो.

तथापि, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. कारण खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध नाही.

सुमारे 26 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात अंदाजे 2 ते 3 टक्के भटके श्वान असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अनुमान आहे. म्हणजेच शहरात 50 ते 70 हजारांदरम्यान भटके श्वान असू शकतात.

श्वानांची प्रजननक्षमता लक्षात घेता, दरमहा सुमारे 250 ते 300 नवीन पिल्लांचा जन्म होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

महापालिकेकडून नागरिकांना रस्त्यावर भटक्या श्वानांना खाद्य देताना खबरदारी घेण्याचे, तसेच भटक्या श्वानांनी चावा घेतल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सर्व 33 आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजविरुद्धची लस नियमितपणे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सुदैवाने, या वर्षी भटक्या श्वानांनी चावल्यामुळे एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने स्पष्ट केली.


हेही वाचा

सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांवर गुन्हा दाखल

कसारा, कर्जतपर्यंत 15 डब्ब्यांची लोकल धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या