वडाळ्यात अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा - पादचाऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी पदपथांची व्यवस्था करण्यात अली आहे. मात्र अनेक ठिकाणच्या पदपथावर अनधिकृतरित्या अतिक्रमण करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास जागाच उरलेली नाही. असे चित्र सध्या वडाळा येथील अँटॉप हिलच्या एस.पी. रोडवरील बेस्ट पॉवर हाऊस येथे पाहायला मिळत होते. मात्र पालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने मंगळवारी येथील अनधिकृत वाढीव बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.

या ठिकाणी असलेल्या गटारांवर अनेक दुकाने आणि कारखाने अनधिकृतरित्या वाढीव काम करून बांधण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली होती. मात्र शेकडो बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. जेसीबीमुळे होणारे नुकसान पाहून भेदरलेल्या स्थानिक दुकानदार आणि घरमालकांनी स्वतः च वाढीव बांधकाम पाडणार असल्याची विनंती कर्तव्यावर असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. परिणामी जेसीबीमुळे स्थानिकांचे होणारे नुकसान पाहून महापालिका अधिकाऱ्यांनी काही काळाकरता तोडक कारवाई थांबवली. त्यामुळे शेकडो दुकानदारांनी आपली दुकाने तसेच घराचे वाढीव बांधकाम पाडण्यास सुरुवात केली.महापालिकेच्या एफ उत्तर विभागातर्फे यंदा पावसाच्या दोन महिने आधी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सलग तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडाळा टीटी पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या