कोरोनासंदर्भातील माहितीसाठी ‘या’ व्हाॅट्सअॅप हेल्पलाईनवर संपर्क साधा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतात वेगाने पसरत असलेल्या काेरोना व्हायरसला (coronavirus) थोपवण्यासाठी सर्व राज्य प्रयत्नशील आहेत. संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. नागरिकांवरही सावधगिरी बाळगण्याची मोठी जबाबदारी आहे. अशा स्थितीत आपल्या कुटुंबातील किंवा आजूबाजूला कुठल्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून घाबरून जाण्याची गरज नाही. याबाबत तात्काळ प्रशासनाला कळवता यावं, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. त्यातच आता व्हाॅट्सअॅपवरूनही नागरिकांना संवाद साधता येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या बाबतीत खात्रीलायक माहिती देणारी तसंच मार्गदर्शन करणारी व्हाॅट्सअॅप हेल्पलाईन (whatsapp helpline) सुरू केली आहे. "COVID Helpline Maharashtra"  असं या हेल्पलाईनचं नाव असून नागरिकांना या हेल्पलाईनवर मेसेज करून अपडेट राहता येईल. त्यासाठी नागरिकांना आपल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावरून +91-2026127394 या क्रमांकावर "Hi" करावं लागेल आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीची विचारणा करावी लागेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या हेल्पलाईनची घोषणा केली होती.

त्याआधी जनतेला उद्देशून साधलेल्या संवादात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, तो बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत. परंतु जीवनावश्यक वस्तू आणायला घराबाहेर जात असाल तर एकट्यानंच जा. गर्दी करू नका. घरांमधले एसी बंद करण्याचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. त्यामुळे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल, असं ते म्हणाले.
किमान वेतन मिळणार
ज्यांच तळहातावर पोट आहे, त्यांची काळजी सरकार घेणार आहे. सरकारच्या मदतीला आज अनेक हात पुढं येत आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद ठेवलं आहे, त्या कंपन्यांचे उद्योजक व मालक वर्गानं माणुसकीचा विचार करुन नोकरदारांचं किमान वेतन कापू नये, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. 

पुढील बातमी
इतर बातम्या