सलग दुसऱ्या दिवशीही सीएनजी पुरवठा ठप्प

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र सरकारी गेल लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडून मुंबईतील 10 लाखांहून अधिक वाहनांना सीएनजी (CNG gas) आणि 20 लाखांहून अधिक घरांना स्वयंपाकासाठी तसेच कारखान्यांना औद्योगिक वापरासाठी सीएनजीचा पुरवठा होतो.

हा वायूपुरवठा महानगर गॅसच्या वडाळा (wadala) येथील सीजीएस केंद्रातून होतो. मात्र, त्या स्थानकात वायू घेऊन येणाऱ्या वाहिनीतच रविवारी सकाळी बिघाड झाल्याने मुंबईतील सीएनजी पुरवठा बाधित झाला.

मुंबईत (mumbai) महानगर गॅसकडून 480 पंपांना सीएनजीचा पुरवठा होतो. कुठल्याही पंपाकडे सहसा केवळ एक दिवसाचा साठा असतो. हा साठा रविवारी रात्रीपर्यंतच पुरला.

रविवारी रात्री महानगर गॅसने तेल कंपन्यांमार्फत केवळ त्या कंपन्यांचा नियमित समन्वय असणाऱ्या पंपांना सीएनजीचा कमी दाबाने पुरवठा केला. त्यामुळे ७० टक्के पंप कमी दाबाने असले तरी सुरू होते.

मात्र, हा साठाही बहुतांश पंपांवर सोमवारी सकाळी 11 वाजता संपला, असे मुंबई पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन मोदी यांनी सांगितले.

खासगी पंप सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान सीएनजीने रिते झाल्यानंतर महानगर गॅसने काही पंपांना कमी दाबाने पुरवठा सुरू ठेवला होता.

त्यामध्ये महानगर गॅसचे स्वत:चे पाच ते सात पंप आणि सरकारी तेल कंपन्यांच्या निवडक कंपन्यांना समावेश होता. मात्र, जेमतेम 35 ते 40 टक्के चारचाकी वाहनांना सीएनजी मिळू शकला. 

389 पैकी 225 पंपांचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा महानगर गॅस लिमिटेडने केला. दुरुस्तीचे काम आज मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 च्या दुपारपर्यंत पूर्ण होऊन गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले होते.

मात्र अद्याप यावर कोणतीही सूचना न मिळाल्याने सीएनजी वाहनचालक तसेच इतर नागरिक संभ्रमात पडले आहेत.

रविवार दुपारपासून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात सीएनजीचा पुरवठा बंद झाला. गॅस पुरवठा महानगर गॅस लिमिटेडकडूनच केला जातो.

रिक्षा-टॅक्सी चालक मालकांना त्यांच्या दोन दिवसांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.


हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे तोडण्यास परवानगी पण...

कोस्टल रोडला 325 मीटर लांबीचा पादचारी मार्ग जोडणार

पुढील बातमी
इतर बातम्या