चर्चगेट ते विरारदरम्यान आणखी १२ वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली असली, तरी यासाठी सर्वसाधारण लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून होणार आहे. एसी लोकल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत शंभरहून अधिक सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात आता आणखी १२ फेऱ्यांची भर पडणार असल्यामुळे सर्वसामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे त्यांनी पश्चिम रेल्वेच्या या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला आहे.
धावत्या लोकलमधून पडून होणारे मृत्यू कमी करण्यासह प्रवास गारेगार होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एसी लोकल सुरू केली. प्रथम श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट-पास महाग असूनही एसी लोकलला गर्दी वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांकडून अधिक एसी लोकल चालवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने आणखी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या फेऱ्या रद्द होणार?
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेमध्ये सहा अप आणि सहा डाउन अशा एकूण १२ लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नव्या एसी फेऱ्या सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येतील. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०९वरून १२०वर पोहोचली आहे. एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून हा आकडा एक हजार ४०६ इतका कायम असणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.