पालिका कर्मचाऱ्यांकडून आदिवासी मुलांना संगणक भेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या अनेक राजकीय नेतेमंडळी स्वत:चे नाव मोठे करण्यासाठी थोर पुरुषांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. पण जी उत्तर विभागात सफाई कामगार म्हणून काम करणारे कर्मचारी कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने जयंती साजरी करतात. धारावी डेपोसमोर या कर्मचाऱ्यांचे कार्यालय आहे. याच ठिकाणी दरवर्षी हे कर्मचारी थोर पुरुषांची संयुक्त जयंती साजरी करतात. या जयंतीला हे सर्वच कर्मचारी आपापल्या परीने वर्गणी जमा करतात. याठिकाणी दरवर्षी वर्गणीतून 30 ते 35 हजार जमा झालेले पैसे गरीब गरजूंच्या मदतीसाठी वापरतात. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना छोटीशी मदत म्हणून या कर्मचाऱ्यांनी 30 हजार रुपये नाम फाऊंडेशनला दिले होते. यावर्षी काही वेगळं करण्याच्या उद्देशाने भरत बाड, जयंती पडाया आणि संजय कोकणे यांच्या कल्पनेतून वाडा तालुक्यातील दोनघर या आदिवासी पाड्यातील एका शाळेला संगणक भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार जयंतीसाठी जमा झालेल्या रकमेतून या कर्मचाऱ्यांनी एक संगणक विकत घेत, या गरीब मुलांना भेट म्हणून दिला आहे. तसेच यापुढेदेखील अशाच प्रकारे सर्वांना मदत करत राहणार असल्याचे यावेळी विश्वजीत पेठे या कर्मचाऱ्याने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या