दहिसर, पोयसर, वालभट, ओशिवरा नद्यांमध्ये लवकरच नौकाविहार!

नाल्यांचे स्वरुप आलेल्या मुंबईतील दहिसर, पोयसर, वालभट तसेच ओशिवरा नद्यांना मूळ स्वरूप प्राप्त करून दिले जाणार आहे. यासर्व नद्यांचे दुषितीकरण रोखण्यासाठी ड्रोन मॅपिंग आणि स्थळ सर्वेक्षण करून येथील भौगोलिक स्थितीनुसार या नद्यांना मूळ स्वरुप देतानाच या ठिकाणी नौकाविहाराचीही व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा विचार महापालिका करत आहे.

सल्लागाराची नेमणूक

झोपडपट्टीचे सांडपाणी, छोट्या रासायनिक कारखान्यातील पाणी, गाळे, तबेले येथील सांडपाणी आदींमुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण रोखून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक केल्याची माहिती मिळत आहे.

ही कामं करणार सल्लागार

या सल्लागारांमार्फत नदीतील विविध ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी त्यात असलेले वॉटर ऑक्सिडंट्स, केमिकल ऑक्सिडंट्स, टोटल सस्पेंडेड सॉलिड्स, टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड्स आणि फॉस्फेट्स यासारख्या घटकांची माहिती घेतली जाणार आहे. भौगोलिक सर्वेक्षण तसेच मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येणाऱ्या खोदकाम तथा भुयारी मार्ग बनवण्यासाठी ते योग्य आहे का? तसेच या नद्यांसह उपनद्या, पावसाळी जलवाहिन्या, नाले, गटारे, नदीमुळे आदींची भौगोलिक माहिती प्रणाली आणि त्यांची पाणलोट क्षेत्राची व्यवहार्यता समजून घेतली जाणार आहे.

नद्यांच्या विकासानंतर काय दिसणार?

या सर्व नद्यांमध्ये येणारं दूषित पाणी नदीमध्ये येण्याआधी जमा करून ते मलनि:सारण वाहिनीमार्फत मलप्रक्रिया प्रकल्पांमध्ये वळवण्यात येणार आहे. नदीच्या दोन्ही काठांवर रस्ते बांधणे, नदीकाठावर असलेले तबेले आणि धोबीघाट काढणे, शक्य असल्यास पादचारी पूल बांधणे, घनकचरा विल्हेवाट लावणे, नदीतील पाण्याची जैविक गुणवत्ता सुधारणे, तसेच जैव विविधता सुधारण्यासाठी तरतूद करणे, कांदळवन (तिवर)उद्यान बनवणे, मत्स्यपालन, नौकाविहार, पक्षी निरीक्षण मनोरा तसेच मैदाने आदी प्रकारची व्यवस्था केली जाणार आहे.

संरक्षक भिंतींचे काम सुरू

मुंबईतील दहिसर, पोयसर, वालभट तसेच ओशिवरा आदी नद्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम यापूर्वीच महापालिकेने हाती घेतले आहे. सांडपाणी मलनि:सारण वाहिन्यांद्वारे वळवणे, त्याशेजारील बांधकामे हटवून तिथे उद्यान विकसित करणे आदी प्रकारची कामे हाती घेण्यासाठी याचा सर्वकष आराखडा बनल्यानंतर याचे काम हाती घेतले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

'फ्लोटिंग ट्रॅश बूम' रोखणार नाल्यातला कचरा

पुढील बातमी
इतर बातम्या