१५ ते १७ वयोगटातील ५५ टक्केच किशोरवयीनांनी घेतली पहिली मात्रा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ ते १७ वयोगटातील सुमारे ५५ टक्के किशोरांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर दुसरी मात्रा सुमारे १२ टक्के किशोरांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

राज्यात किशोरवयीनांचे लसीकरण १ जानेवारीपासून सुरू झाले. जवळपास ४० दिवसांमध्ये सुमारे ३३ लाख ३१ हजार किशोरांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली आहे. राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. परीक्षांपूर्वी या विद्यार्थ्यांनी लस घेण्याचे आवाहन मंडळाने सातत्याने केले आहे.

किशोरांचे सर्वाधिक ७७ टक्के लसीकरण भंडारा जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल कोल्हापूर, सांगली, नगर, सातारा, लातूर, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यभरात सर्वात कमी सुमारे ३७ टक्के लसीकरण सोलापूरमध्ये तर सुमारे ४० टक्के लसीकरण नंदुरबार जिल्ह्यात झाले आहे. किशोरांसाठी कोव्हॅक्सिन लशीला परवानगी दिली असल्यामुळे २९ दिवसांमध्येच किशोरांच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण सुरू झाले आहे.

राज्यात सांगलीमध्ये दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या या वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक सुमारे ३८ टक्के आहे. त्या खालोखाल रायगड, नागपूर, अमरावती, ठाणे आणि नगर या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या मात्रेचे लसीकरम्ण जास्त प्रमाणात झाले आहे.

प्रौढांचे लसीकरण वेगाने पूर्ण करणाऱ्या मुंबईमध्ये मात्र किशोरांच्या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मुंबईत किशोरांचे लसीकरण संथगतीने सुरू आहे. मुंबईत सुमारे ४६ टक्के किशोरांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, तर दोन्ही मात्रा पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण सुमारे आठ टक्के आहे.

किशोरवयीनांच्या लसीकरणाबाबत भीती आणि गैरसमज अजूनही आहेत. त्यामुळे यांचे लसीकरण अधिक प्रमाणात करण्यासाठी लस साक्षरता करणे अधिक गरजेचे आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या