अद्याप लॉकडाऊनची वेळ आलेली नाही - सुरेश काकणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊनची भीती नागरिकांना सतावत आहे. मात्र, ही भीती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी काहीशी दुर केली आहे. ९७ टक्के रुग्ण हे इमारतीत राहणारे असून, केवळ २ ते ३ टक्के लोक हे दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. त्यामुळं सध्या लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येईल असे वाटत नाही, असं मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले आहे.

मागील महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी देखील ११०३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळं चिंता व्यक्त होत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चेंबूर, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, कांदिवली, बोरवली आदी विभागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्यातरी लॉकडाऊनची वेळ आलेली नाही.

परिस्थिती नियंत्रणात असून विविध  उपाययोजना पालिका प्रशासनाकडून राबवण्यात येत असल्याचं मत व्यक्त केलं. दरम्यान, मुंबईत २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंतचा कोरोना वाढीचा दर हा ०.२९ टक्के इतका आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्के इतका असल्याचं समोर आलं आहे. ३ मार्चपर्यंत मुंबईत ३३ लाख ५३ हजार १२४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबईत १४ ॲक्टिव्ह कटेंन्टमेन झोन असल्याचे समोर आलं असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकूण १८५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. गर्दी टाळण्यासाठी मुंबईत २९ खाजगी रुग्णालयाला केंद्र सरकारनं लसीकरणाची परवानगी दिली आहे. महापालिकेच्या २३ आणि १६ खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांनी आधी नोंदणी करावी आणि नंतर केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असं आवाहन काकाणी यांनी केलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या