गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या २७२ जणांना कोरोना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या गणेशभक्तांपैकी २७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयांकडून देण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यंदा गणेशोत्सवानिमित्त जवळपास २ लाख १७ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणात दाखल झाले होते. त्या तुलनेत कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या १ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण कोरोना चाचणी करून आणि २ लसमात्रा घेऊन आलेले होते. ४० हजार जण चाचणीसाठी पात्र होते; परंतु त्यातील साधारण  २० हजार जण १८ वर्षांखालील असल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित २० हजार जणांपैकी १२० जणांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले.

त्याव्यतिरिक्त ७२ जणांना कोरोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून ८७ हजार ८३७ जण जिल्ह्यात दाखल झाले. त्यातील ३० हजार २१६ जणांनी २ लसमात्रा घेतल्या होत्या. २० हजार जणांचे कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आले. जिल्ह्यात ८ हजार १०४ जण तपासणी न करताच आले. त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली असता १५२ जण कोरोनाबाधित आढळले.

यंदा गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी आपल्या गावची वाट धरली होती. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे अगळीवेगळी मजाच असते. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यंदाही अनेकांनी आपल्या गावची वाट धरली. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्हा आणि पुणे येथून कोकणासाठी २२०० जादा गाड्या सोडल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही सव्वादोनशेहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या.

याव्यतिरिक्त खासगी बस आणि वैयक्तिक वाहनांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त गावी गेले. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख ३० हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८७ हजार ८३७ जण दाखल झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या