कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं कोव्हिड कचऱ्यातही वाढ होत आहे. परंतु, कोव्हिड कचरा संकलनाबाबतच्या नव्या नियमांमुळं कचरा निर्मूलन केंद्रांवरील ताण कमी झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जुलैच्या अखेरीस जारी केलेल्या सुधारीत नियमावलीनंतर कोव्हिड जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये अनावश्यक बाबींची सरमिसळ थांबली.
मागील ४ महिन्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबरोबरच कोव्हिड जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ झाली होती. मागील २ महिन्यांत इतर वैद्यकीय उपचारांमध्येदेखील सुरक्षा साधनांचं प्रमाण वाढल्यानं एकूणच जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळं राज्यात एरवी तयार होणाऱ्या एकूण जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण नेहमीपेक्षा (६० टन) दीडपटीनं वाढून ९० टनापर्यंत पोहचलं.
कोव्हिड कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजैववैद्यकीय (खाद्यपदार्थ, आवरणं इ.) कचऱ्याचा समावेश वाढला होता. त्यामुळं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्यासाठी सुधारित नियमावली गेल्या महिन्यात जारी केली. त्यानंतर कोव्हिड जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या केंद्रावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला.
कोव्हिड कचऱ्याची विल्हेवाट भस्मीकरणाद्वारेच केली जाते. या कचऱ्यात शिल्लक खाद्यपदार्थ, फळाच्या रसाचे रिकामे टेट्रा पॅक, अर्धवट पाण्याच्या बाटल्या, एकावेळीच वापरल्या जाणाऱ्या प्लेट, ग्लास आणि विविध प्रकारची आवरणं, पिशव्या यांची सरमिसळ यापूर्वी होत असे. इतर जैववैद्यकीय कचऱ्यांमध्ये पीपीई किट व प्लास्टिकचे प्रमाणदेखील वाढले होते.
'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष
COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या