कोरोना रुग्णांच्या शेजारी पुन्हा मृतदेह, राजावाडी रुग्णालयातील घटना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मृतदेह एका प्लास्टिग बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, तत्काळ रुग्णालयाच्या डीनवर कारवाई करत निलंबन करण्याची मागणी केली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये मृतदेह एका प्लास्टिग बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. मृतदेहाच्या शेजारी एक महिला रुग्ण असून इतर रुग्ण असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या १० ते १२ तासांपासून हा मृतदेह इथं पडून आहे. या लोकांनी मृतदेहाला प्लास्टिकमध्ये कव्हर करुन ठेवलं आहे. बाजूला इतर रुग्णही आहेत. त्या बाजूला अजून एक मृतदेह पडलेला आहे. यांच्यामुळं आमच्या जीवाला धोका आहे. अजूनपर्यंत एकही कर्मचारी आलेला नाही', अशी माहिती मतदेहा शेजारील बेडवर असलेल्या महिला रुग्णानं शूट करत दिली आहे.

आम्हाला अन्न, पाणी काहीच जात नाही. हा एका महिलेचा मृतदेह असून तडफडून तिचा मृत्यू झाला आहे. मीच तिला पाणी पाजलं. कोणी पाणी पाजायलाही येत नाही. आमच्याकडे ग्लोव्ह्जही नाही. सरकार काम करतंय पण बाहेर दाखवतात तेवढं आतमध्ये होत नाही. मला वाटतं सरकारी रुग्णालयात सीसीटीव्ही लावले पाहिजे. त्यामुळे हे लोक काय करतात हे दिसेल. १५ तास जर रुग्णांमध्ये मृतदेह ठेवला तर कसं होईल. मी येथे बरी होण्यासाठी आली होती. पण आता घरी गेलेलं बरं असं वाटत आहे', असंही त्यांनी म्हटलं.

याप्रकरणी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या ठाकूर यांनी एका वत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. नातेवाईक उशिरा येत असल्यानं अनेकदा मृतदेह ४० ते ४५ मिनिटं किंवा तासभर बेडवर पडून असतो. कोरोना रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांकडं सोपवला जाईपर्यंत तो वेगळा ठेवण्याची व्यवस्था आमच्याकडं करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास करत असून नेमकं काय झालं होतं याची माहिती घेत आहोत, असं सांगितलं.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या