नगरसेवक एक साथ !

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई – रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत. पण महानगरपालिका प्रशासन मात्र खड्ड्यांवरून खोट्यावर खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारीही स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी केवळ 35 खड्डे असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रशासनाच्या खोटारडेपणाला वैतागलेल्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. 'खड्डयात गेले खोटे प्रशासन' असे म्हणत सर्व पक्षांनी आता खड्ड्यांच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे.

गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवले जातील, असे जाहीर केले होते. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आठवडाभरात भरात मुंबईतील सर्व खड्डेच काय, एकही खड्डा बुजवला गेला नसल्याचा आरोप करता शिवसेना, भाजपासह काँग्रेस, मनसे आणि सपानेही प्रशासनाला धारेवर धरले.

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त रस्त्यांवर जाऊन रस्त्यांची पाहणी करतात काय? मग विभागीय अधिकारी जे आकडे देतात त्यावर विश्वास ठेवून मुंबईत 35, 39 खड्डे आहेत, असे कसे काय अतिरिक्त आयुक्त सांगतात? असा सवाल नगरसेवकांनी केला. तर आता आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे, रस्त्यांची पाहणी करावी आणि किती खड्डे आहेत ते स्थायी समितीसमोर सांगावे, अशी मागणी सर्व पक्षांनी केली. शेवटी ही मागणी अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ही मान्य करत पुढील बैठकीत आयुक्तांनी रस्त्यांची पाहणी करुन खड्ड्यांची मागणी द्यावी, असे निर्देश दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या