७ लाख रुपयांची ४७५ रेल्वे ई-तिकिटे जप्त, १९ दलालांना बेड्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेनं तिकिटांच्या काळ्या बाजारावर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. बोनाफाईड प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांमध्ये, अँटी टाउट स्क्वॉड (एटीएस), वाणिज्यिक शाखा मुंबई विभागाने आरपीएफच्या मदतीने अनधिकृत तिकीट विक्रेत्यांविरोधात सखोल तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत जानेवारी २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये एटीएस टीमने १९ दलालांना अटक केलं असून, त्यांच्याकडून ७.२२ लाख रुपयांची ४७५ ई-तिकिटे जप्त करण्यात आले आहेत.

गणरायाच्या आगमनाच्या पहिल्या दवशी १० सप्टेंबर २०२१ रोजी एटीएस टीम, मुंबई विभागाने आरपीएफसह संयुक्तपणे तपासणी केली. या तपासणीत मुंबईच्या पायधुणी परिसरातील नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे छापा टाकला. या कारवाईत बेकायदेशीर ई-तिकिटिंग खरेदी व्यवसायात सहभागी असलेल्या २ जणांना अटक केली.

दोघांनीही आरोप कबूल केले आहेत. दोन्ही व्यक्तींना २ डेस्कटॉप, मोबाईल तसेच १२२ ई-तिकिटांसह पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरपीएफ तसेच एटीएसने आरोपींना आरपीएफ पोस्ट कुर्ला येथे आणले. त्यानंतर या आरोपींविरोधात कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

२५ एप्रिल रोजीदेखील वडाळा (पूर्व), मुंबई येथे असेच ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी दादरयेथील RPF च्या मदतीने ५७७००  ३६ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. तसेच मुख्य दक्षता निरीक्षक आणि आरपीएफ कुर्ला यांच्या दुसर्‍या संयुक्त कारवाईमध्ये, भाईंदर येथे १,११,१७५ रुपयांची १५१ ई-तिकिटे जप्त करण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या