मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील आणखी 22 लोकल 12 डब्यांवरून 15 डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 15 ऑगस्ट 2026 पासून लागू झाला आहे.

या निर्णयामुळे CSMT-कर्जत/खोपोली मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली येथून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची प्रवासक्षमता वाढणार आहे.

प्रत्येक लोकलमध्ये 3 डबे वाढल्याने प्रति लोकल प्रवासी क्षमता तब्बल 25 टक्क्यांनी वाढणार आहे.

कोणत्या महत्त्वाच्या लोकल 15 डब्यांच्या?

डाउन दिशेच्या सेवांमध्ये :

  • दादर–खोपोली : सकाळी 7.43
  • CSMT–कर्जत : सकाळी 9.57
  • CSMT–बदलापूर : दुपारी 4.42
  • CSMT–अंबरनाथ : संध्याकाळी 7.42
  • CSMT–कर्जत : संध्याकाळी 7.50
  • CSMT–खोपोली आणि CSMT–अंबरनाथच्या काही सेवांचे स्लोवरून फास्टमध्ये रूपांतर

अप दिशेच्या सेवांमध्ये :

  • खोपोली–दादर : पहाटे 4.50
  • अंबरनाथ–CSMT : सकाळी 8.27
  • खोपोली–कर्जत : सकाळी 10
  • कर्जत–CSMT : दुपारी 12.23
  • खोपोली–CSMT : दुपारी 1.48
  • कर्जत–CSMT : सायंकाळी 5.33
  • बदलापूर–CSMT : सायंकाळी 6.17
  • अंबरनाथ–दादर : रात्री 9.07

15 डब्यांच्या लोकलची संख्या 54 वर

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर 2012 मध्ये पहिल्यांदा 15 डब्यांची लोकल सुरू करण्यात आली होती. त्यावेळी 16 सेवा होत्या. 2019 मध्ये आणखी 6 सेवा वाढून संख्या 22 झाली.

20 जुलै 2026 रोजी आणखी 10 सेवा 15 डब्यांच्या करण्यात आल्या, त्यामुळे संख्या 32 वर पोहोचली होती.

आता आणखी 22 सेवांचे अपग्रेडेशन झाल्याने मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलची संख्या 32 वरून थेट 54 झाली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, एकूण उपनगरीय लोकल सेवांची संख्या 1,820 इतकीच राहणार आहे. म्हणजे नवीन लोकल वाढवण्याऐवजी विद्यमान सेवांची प्रवासी क्षमता वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबईतील अनेक रिक्षाचालक अद्यापही मराठी प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत

पुढील बातमी
इतर बातम्या