बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अंतिम मुदत मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुक प्रक्रिया निकालासह पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया येत्या काही काळात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाला ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या चार महिन्यात घेण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. पण ही मुदतही संपत आली पण अद्याप निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.
निवडणूक आयोगाने आणखीन काही महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी कोर्टात याचिका केली होती. त्यानुसार न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.
यासोबत न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. यापूर्वी दिलेल्या चार महिन्यात निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला. सप्टेंबर आणि डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा, अशी विचारणा करण्यात आली.
यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सणांचे कारण पुढे केले. आमच्याकडे ईव्हीएम यंत्रे ही नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, सध्या प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया मोठी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती.