नौदलाच्या सामर्थ्यात भर, ‘आएनएस’ खांदेरीचं लोकार्पण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
संपूर्ण भारतीय बनावटीची, स्काॅर्पियन श्रेणीतील ‘आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी शनिवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या पाणबुडीचं ‘वेस्टर्न नेव्हल कमांड’ मध्ये लोकार्पण करण्यात आलं. 

नौदलाची क्षमता वाढणार

“मुंबईवर २६/११ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढल्याचं पाकिस्तानने आता लक्षात ठेवावं. देशातील सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.

 

रडारवर न प्रकटणारी

‘आएनएस’ कलवरी पाठोपाठ नौदलात दाखल झालेली खांदेरी ही स्काॅर्पियन श्रेणीतील दुसरी पाणबुडी आहे. शत्रूवर थेट हल्ला करण्याची या पाणबुडीत क्षमता आहे. कन्व्हेन्शनल डिझेल इलेक्ट्रीक यंत्रणेवर चालणारी ही पाणबुडी पाण्यात कुठलाही आवाज न करता चालते. यामुळे रडारवर ही पाणबुडी दिसत नाही. या पाणबुडीचा वेग २० नाॅटीकल मैल इतका आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली असून अजून ४ पाणबुड्या २०२३ पर्यंत बांधण्यात येणार आहे. खांदेरीमुळे नौदलाच्या सामरिक ताकदीत वाढ होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या