पेडर रोड, वॉर्डन रोडसह केम्स कॉर्नरवरील वाहतूक कोंडी फुटणार

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

दक्षिण मुंबईतील पेडर रोड, केम्स कॉर्नर, वॉर्डन रोडसह हाजी अली इत्यादी भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सर्वाधिक आहे. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महापालिका आराखडा तयार करत आहे. याशिवाय येथील सिग्नल व्यवस्था आणि अनधिकृत वाहनतळाबरोबरच इतर बाबींचा अभ्यास करून वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे.

आराखडा तयार

महापालिकेच्या डी विभागातील काही रस्ते व्हीव्हीआयपी रस्ते म्हणून ओळखले जातात. या डी विभागातील पेडर रोड अर्थात डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, केम्स कॉर्नर येथील सिताराम पाटकर मार्ग, बाबुलनाथ रोड, ऑगस्ट क्रांती मार्ग, केम्स कॉर्नर जंक्शन, नेपीयन्सी रोड, बाळ गंगाधर खेर मार्ग, हाजी अली जंक्शन आणि वाळकेश्वर रोड आदी रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्याची सूचना सह पोलिस आयुक्त (वाहतूक) यांनी रस्ते विभागाला केली होती.

या सूचनेनसार या विभागाचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार संबंधित वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने आणि आयआरसी यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन आवश्यक त्या वाहतूक सुविधा पुरवण्याचं काम हाती घेण्याकरता आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली आहे.

या सुविधा होणार उपलब्ध

यामध्ये रस्त्यांवरील वाहतूक कोडी, सिग्नल यंत्रणा, रस्त्यांवर उभी केली जाणारी वाहने, त्यासाठी लावण्यात येणारे फलक आदींचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार दिशादर्शक फलक, स्थळदर्शक फलक, इशारा फलक, रस्ते दुभाजक, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत असल्याचं चिठोरे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या