इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा राजीनामा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र ती सध्या खूप आजारी आहे, शिवाय डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत हा इमानच्या बहिणीने केलेला आरोप डॉक्टरांनी फेटाळला आहे. इमानच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपामुळे व्यथित झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी राजीनामा दिला आहे. इतकी काळजी घेतल्यानंतरही असे आरोप होणे म्हणजे दु:खद गोष्ट असल्याचे डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी म्हटले. इमानची बहीण शायमा यांनी केलेल्या आरोपावर आपली बाजू मांडण्यासाठी मंगळवारी सैफी रुग्णालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी डॉ. अपर्णा बोलत होत्या.

इमानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून तिची काळजी घेतली जात आहे. शिवाय तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली असून तिचे सिटी स्कॅन मंगळवारी केले आहेत. त्याचे अहवाल लवकरच येतील. इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचे वजनही करून घेतले नाही. जर केले असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान इमानची बहीण शायमा यांनी दिले होते.

शायमांचे आव्हान स्वीकारत डॉक्टरांनी तिचे सध्याचे वजन करून दाखवले. शिवाय तसे पत्रही डॉ. लकडावाला यांनी दिले आहे. इमानसाठी शक्य ते प्रयत्न केले, मात्र शायमा यांच्या आरोपांमुळे दुःखी असल्याचंही डॉ. अपर्णा म्हणाल्या.

उपचारांसाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होते. पण आता तिचे वजन 200 किलोपेक्षाही कमी झाले आहे. तिच्यावर फिजीओथेरेपीचे उपचार सुरू आहेत. तिच्या बहिणीने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ ही दुखद बाब आहे. गैरसमजुतीमुळे तिच्या बहिणीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, मात्र त्यात तथ्य नाही. तिचे वजन वाढण्याबरोबर तिला इतरही आजार आहेत, ते तीन ते चार महिन्यात बरे होणार नाही, असे सैफी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हुजफ्फल शहाबीन यांनी म्हटले आहे.

इमानला इजिप्तला घेवून जायला तिचे नातेवाईक तयार नसल्याने अशा प्रकारे आरोप केले जात असल्याची शंका डॉ. अपर्णा भास्कर यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या राजीनाम्याबाबत डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरही सविस्तर खुलासा केला आहे.

इमानच्या बहिणीने रुग्णालयात इमानवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचे आरोप केले होते. त्यासंदर्भातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.mumbailive.com/mr/health/sister-of-worlds-heaviest-woman-alleged-on-doctor-10830

पुढील बातमी
इतर बातम्या