वरळीतील 'त्या' प्रकरणी डॉक्टर बडतर्फ, परिचारिका निलंबित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वरळी येथील बीडीडी चाळीतील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटुंबातील चार महिन्यांच्या मुलासह चौघे जखमी झाले होते. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार महिन्यांचा मुलगा मंगेश पुरी, आई विद्या पुरी (२५) आणि वडील आनंद पुरी (२७) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता नायर रुग्णालयातील एका डॉक्टरांना बडतर्फ, तर एका परिचारिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जखमींच्या उपचारात झालेल्या दिरंगाईप्रकरणी नायर रुग्णालयातील एका डॉक्टरांना बडतर्फ, तर एका परिचारिकेला निलंबित करून त्यांची त्रयस्थ समिती आणि खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

जखमींना रुग्णालयात आणल्यानंतर उपचार करण्यात हेळसांड झाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत होती. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत होता. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने ४ डिसेंबर रोजी सहसंचालक डॉ. अजय चंदेनवाले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या समितीने १३ व १४ डिसेंबर रोजी नायर रुग्णालयात प्राथमिक चौकशीची सुनावणी पूर्ण केली होती. हा अहवाल पालिका प्रशासनाला सादर करण्यात आला. अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलेले डॉ. शशांक झा यांना बडतर्फ, तर परिचारिका प्रीती सुर्वे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यांची खात्यांतर्गत आणि त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. हा अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या