३ वेळा केलं ऑपरेशन तरीही हातात व्यंग, शताब्दी रुग्णालयातील प्रकार

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • सिविक

कांदिवली परिसरातील शताब्दी हे महापालिकेचं रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका ७ वर्षांच्या अमनच्या हातात व्यंग आल्याची घटना समोर आली आहे.

नेमकी काय आहे घटना ?

अमन पांडे हा ७ वर्षांचा मुलगा मे, २०१६ रोजी घरात खेळत असताना अचानक पडला. तो पडल्यामुळे त्याच्या हाताला अंतर्गत जखमी झाली. त्याच्या वडिलांनी त्याला तात्काळ बोरीवलीच्या अंकित या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. रुग्णालयाने त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्या ऑपरेशनसाठी ३५ हजार रुपये खर्च सांगण्यात आला. पण, हा खर्च अमनच्या वडिलांना झेपण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांनी अमनला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं.

मुलासोबत आईला त्रास

तपासणीनंतर शताब्दी रुग्णालयात अमनच्या हातावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, या शस्त्रक्रियेनंतर अमनचा हात वाकडा झाल्याचं निदर्शनास आलं, म्हणून त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही त्याचा हात सरळ झाला नाही. शिवाय, या शस्त्रक्रियेनंतर अमनच्या हाताला प्रचंड वेदना होऊ लागल्या, म्हणून डॉक्टरांनी तिसरी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यासाठी अमनची आई माधुरी पांडे यांच्या कंबरेतील एक हाड अमनच्या हातासाठी वापरण्याची शक्कल लढवली. ही तिसरी शस्त्रक्रियाही पार पडली. तरी देखील अमनचा हात सरळ करण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. शताब्दी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी अमन आणि त्याच्या आईला खूप मोठं व्यंगत्व दिल्याचा आरोप अमनचे वडील उमेश पांडे यांनी केला आहे.

वर्षभर मारल्या फेऱ्या

अमन पांडे हा मूळचा बोरिवली इथं राहणारा असून त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासामुळे त्याच्या कुटुंबाला नालासोपारा इथं स्थायिक व्हावं लागलं. गेले वर्षभर डॉक्टर शस्त्रक्रिया करून त्याचा हात सरळ करण्याचं आश्वासन त्याच्या कुटुंबियांना देत आहेत. त्यासाठी वर्षभर आम्ही रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहोत, तरीही काही झालेलं नाही, अशा शब्दांत अमनचे वडील उमेश पांडे यांनी हतबलता व्यक्त केली.

आता चौथी शस्त्रक्रिया?

रुग्णालयाने आता अमनच्या हाताची चौथी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. पण, आता त्यासाठी आणखी किती वेळ लागणार याबद्दल काही डॉक्टरांनी सांगितलं नाही. शिवाय, ज्यांनी अमनची शस्त्रक्रिया केली आहे, त्या सर्व जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करावी आणि अमनचा हात आधीसारखा करुन द्यावा

- उमेश पांडे, अमनचे वडील

या विषयी शताब्दी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप आंग्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अमनवर ही वेळ आल्याचा आरोप चुकीचा आहे. शिवाय, आम्ही अमनवर कशा पद्धतीने शस्त्रक्रिया केली की त्याचा हात सरळ होईल, याचा अभ्यास करतो आहोत. महिन्याभरात ही शस्त्रक्रिया करू. ती मोफत असेल. या प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमली असून त्याचा अहवाल आल्यावर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

- डॉ. प्रदीप आंग्रे, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक, शताब्दी रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या