मुंबईतलं डाॅल्फिन दर्शन खरंखुरं!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील वरळी सी फेसवर डॉल्फिनचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक नव्हे, तर अनेक डॉल्फिन समुद्रात मस्तपणे विहार करताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ खरा आहे की खोटा? याबाबत मुंबईकरांमध्ये चर्चा रंगलेली असताना महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी 'डाॅल्फिन दर्शन' खरं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एवढंच नव्हे, तर मुुंबईच्या समुद्रात हिवाळ्यामध्ये नेहमीच डाॅल्फिन येत असल्याचंही ते म्हणाले.

भक्ष्याच्या शोधात

मागच्या एक ते दोन दिवसांपासून व्हाॅट्सअॅपवर वरळी सी फेसच्या समुद्रात डाॅल्फिन विहार करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकाबाजूला हा व्हिडिओ खरा की खोटा? यावरून चर्चा रंगलेल्या असताना, काही जणांनी थेट वरळी सी फेस किनाऱ्याकडेही धाव घेतली. वरळी सी फेसचं पाणी उथळ असल्याने इथं डाॅल्फिन कसे येतील? असे प्रश्नही अनेकांनी उपस्थित केले. पण लहान मासळी खाण्यासाठी अर्थात भक्ष्याच्या शोधात डाॅल्फिननं मुंबईचा समुद्रकिनारा गाठल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं.

याआधीही दर्शन

या आधीही अनेक वेळा मुंबईच्या किनारपट्टीवर डॉल्फिनचं दर्शन घडलं होतं. मुंबईची हवा ही डॉल्फिनसाठी पोषक आहे. डाॅल्फिन प्रामुख्याने खोल समुद्रात विहार करत असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना त्यांचं दर्शन होत नाही. परंतु अधेमध्ये भक्ष्याच्या शोधात ते मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांकडे येतात. सद्यस्थितीत पर्ससिन नेटचा वापर डॉल्फिनसाठी घातक ठरत आहे. गेल्या वर्षी पर्ससिन नेटमुळे अनेक डॉल्फिन्सना जीव गमवावा लागला होता.

- दामोदर तांडेल, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

काही का असेना, या व्हिडिओतील डाॅल्फिनचा स्वच्छंदी विहार पाहून मुंबईकरांना हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघण्याचा मोह होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या