अतिधोकादायक १५४ इमारतींचं वीज, पाणी तोडलं, बीएमसीची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींवर आता मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना करुनही इमारत खाली करण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या इमारतीतील वीज व पाणी कनेक्शन पालिकेने तो़डलं आहे. 

एप्रिल ते ३० जूनपर्यंत १५४ इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार आतापर्यंत १४८ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. 

पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात. मुंबईत ४०७ अतिधोकादायक इमारती आहेत. यापैकी ९८ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर २१ अतिधोकादायक इमारती तोडण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया करण्याआधी तांत्रिक सल्लागार समितीचा सल्ला घेतला जाणार आहे.  ५३ अतिधोकादायक इमारतींचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. ८१ इमारती तांत्रिक कारणामुळे रिकाम्या करण्यात आल्या नसून या इमारतीतील वीज व पाणी कनेक्शन अद्याप तोडण्यात आलेलं नाही.

अतिधोकादायक इमारतींपैकी १५४ इमारतींची आतापर्यंत वीज व पाण्याची जोडणी तोडण्यात आलेली आहे. इमारती कोसळून होणार्‍या दूर्घटनांमध्ये जिवीतहानी होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागातील धोकादायक इमारती, महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ नियमांनुसार अतिक्रमणांच्या आस्थापनांवर यथोचित कार्यवाही तातडीने करण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.



हेही वाचा -

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

  1. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार विशेष गाड्या
पुढील बातमी
इतर बातम्या