मुंबईकरांवर वीज दरवाढीची टांगती तलवार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महावितरणसह बेस्ट, अदानी आणि टाटा समूहाकडून मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात विद्युत पुरवठा केला जातो. या सर्वांकडून मिळणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव पारेषाने वीज आयोगाकडे दिला होता. याबाबत आता मंगळवारी मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील वीज नियामकाच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे.

मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात हे समूह मागील अनेक वर्षांपासून वीज पुरवठा करत आहेत. वेळोवेळी या समूहांनी आपली बाजू मांडून शुल्कात वाढ यापूर्वीही केली आहे. त्या विरोधात अनेकदा संतप्त नागरिकांनी आंदोलनाचाही पर्याय अवलंबला होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी या समूहांनी पुन्हा एकदा शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत समूहांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी अदानी व टाटा समूहाकडून आपली बाजू मांडली जाणार आहे. पारेषण शुल्कात वाढ झाल्यास वीजपुरवठ्याचा खर्च वाढू शकतो.

स्थिर वीज दरानुसार पुढील पाच वर्ष किमान दर ३.७१ प्रति युनिट असावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील वीज नियामकाच्या कार्यालयात सुनावणी पार पाडली जाणार आहे. तर ग्राहक संघटनेला १० जानेवारीपर्यंत हरकती व सूचना मांडण्याची वेळ देण्यात आली आहे. सध्या अदानी समूहाकडून वांद्रे ते भाईंदर आणि सायन ते मानखुर्द दरम्यान १०० युनिटपर्यंतचा वीज पुरवठा केला जातो. घरगुती वापरासाठी ३ रुपये दर आकारण्यात येत असून शुल्कासह हा दर ४.७७ रुपये प्रति युनिट होते. जर वीज पुरवठा करणाऱ्या समूहांचा शुल्क वाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास शुल्कासह सर्व सामान्यांना प्रति युनिट साडेपाच रुपये  हा दर भरावा लागणार आहे. त्यामुळे वीज शुल्क वाढीची टांगती तलवार सध्या मुंबईकरांवर आहे.

  

पुढील बातमी
इतर बातम्या