मुंबईकरांचे आभार! केईएम रुग्णालयात पोहोचले पुरेसे रक्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णांना तातडीने रक्ताची गरज असल्याने केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांकडून रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुंबईकरांनी या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देत जखमींसाठी आवश्यक प्रमाणात रक्तदान केले.

दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच मुंबईतील ठिकठिकाणांहून रक्तदात्यांनी केईएममध्ये धाव घेतली. यामुळे रुग्णालय परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. मात्र प्रामुख्याने ए पाॅझिटीव्ह, बी पाॅझिटीव्ह आणि एबी पाॅझिटीव्ह या तीन गटांतील रक्ताचीच गरज असल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट करताच केवळ याच तीन गटांतील रक्तदात्यांना रुग्णालयात प्रवेश देण्यात आला. सद्यस्थितीत रुग्णालयात पुरेसे रक्त उपलब्ध असून रक्ताचा कुठलाही तुटवडा नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केईएममधील रक्तपेढीत २६७ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. तर महानगर रक्तपेढ्यांमध्ये ६३२ रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. मुंबईतील अन्य रक्तपेढ्यांनादेखील आवश्यकता लागल्यास रक्त पुरवण्यासंबंधी सांगण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे रक्तदानासाठी येणाऱ्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी टाळावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. 

रक्तदात्यांनी येथे साधा संपर्क :

022-24136051

022-24107020


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या