अंधेरीतील अभिषेक नाल्यावरील झोपड्या हटवल्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील इर्ला नाल्याकडे जाणाऱ्या अभिषेक नाल्यावरील झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. गीता नगरमध्ये मोडणाऱ्या या नाल्याच्या मागील बाजूस मागील 10 वर्षांपासून अनधिकृत झोपड्यांनी विळखा घातलेला होता. सुमारे शंभरहून अधिक झोपड्यांनी नाल्याचा मार्ग अडवून अतिक्रमण केले होते. या सर्व झोपड्यांवर बुलडोझर चढवून नाल्याच्या मार्ग खुला करण्यात आला. गुरुवारी झालेल्या कारवाईत 54 झोपड्या तोडण्यात आल्या आहेत.

इर्ला नाला व पम्पिंग स्टेशनकडे जाणाऱ्या अभिषेक नाल्यालगतच्या 6 मीटर परिसरात गीता नगर वसलेले आहे. येथे सुमारे 107 अनधिकृत पक्की बांधकामे होती. कपासवाडी स्मशानवाडीला जोडून असलेल्या गीता नगरमध्ये विटांचे पक्के बांधकाम करून या बेकायदा झोपड्या उभारल्या होत्या. या सर्व झोपड्यांना नोटीसा दिल्यानंतर सुमारे 30 हून अधिक झोपडीधारकांनी न्यायालयात स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सर्व बाधकामे अनधिकृत असून यापूर्वी 2007 मध्ये या सर्व झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती, अशी बाजू महापलिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडली. त्यानंतर न्यायालयाने झोपडीधारकांची मागणी फेटाळून लावत महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.

त्यानंतर गुरुवारी तात्काळ येथील अनधिकृत झोपड्यांविरोधात कारवाई हाती घेऊन 107 पैकी 54 झोपड्या तोडण्यात आल्या. उर्वरीत 53 बांधकामांवरही गुरुवारी आणि शुक्रवारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. ही सर्व बांधकामे तळ अधिक एक मजल्याची पक्की होती. या झोपड्या हटवल्यामुळे अभिषेक नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला झाला असून नाल्यातील गाळ काढण्यासाठी आवश्यक असलेला 6 मीटरचा रस्ताही वाहतुकीसाठी लवकरच खुला करता येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या