13 दिवसांच्या विलंबानंतर अखेर दक्षिण-पश्चिम मान्सूनचे मुंबईत अधिकृत आगमन झाले. मात्र या दमदार पावसाने मुंबईकरांची मोठी परीक्षा घेतली.
पावसामुळे विक्रोळी पश्चिमेतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत असलेल्या सन सिटी कॉम्प्लेक्सजवळ एका इमारतीलगतची भिंत कोसळली. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे एका कारवर झाड कोसळल्याची घटना घडली. झाडाखाली कार चिरडली गेली असून चालक जखमी झाला. बचाव पथकाने तातडीने मदतकार्य करून जखमी व्यक्तीला बाहेर काढले.
पूर्व दादरमधील स्वामी ज्ञानजीवनदास मार्गावरील प्रीतम दा ढाबाजवळ एक मोठे झाड उन्मळून पडले. या घटनेत पार्क केलेल्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
अँटॉप हिल परिसरातही झाड कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने वाहनांमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
घटनांनंतर मुंबई महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यांवरील झाडे, फांद्या आणि ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुंबईत रात्रीच्या काही तासांतच जून महिन्यातील सरासरी पावसाच्या जवळपास 52 टक्के पाऊस झाला.
| परिसर | पाऊस |
|---|---|
| मालवणी (मालाड) | 342 मिमी |
| परळ | 334 मिमी |
| पवई | 294 मिमी |
| दादर-वडाळा | 290 मिमी |
| पश्चिम उपनगर (सरासरी) | 208 मिमी |
| पूर्व उपनगर (सरासरी) | 167 मिमी |
मंगळवारी रात्री 8.30 ते बुधवारी सकाळी 5.30 या कालावधीत खालील हवामान केंद्रांवर अतिवृष्टीची नोंद झाली:
राम मंदिर – 224 मिमी
कुलाबा – 218.5 मिमी
सांताक्रूझ – 210.6 मिमी
या तिन्ही केंद्रांची नोंद अतिमुसळधार पावसाच्या (Extremely Heavy Rainfall) श्रेणीत झाली.
115.6 ते 204.4 मिमी दरम्यान पावसाची नोंद:
सायन
विक्रोळी
विद्याविहार
टाटा पॉवर, चेंबूर
भायखळा
वांद्रे
जुहू विमानतळ
India Meteorological Department (IMD) ने सुरुवातीला मुंबईसाठी रेड नाऊकास्ट इशारा जारी केला होता. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर तो ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला.
मुंबईकरांसाठी सूचना
पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहा.
झाडे, होर्डिंग्ज आणि जुन्या इमारतींच्या परिसरात सावधगिरी बाळगा.
हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावली असली तरी पुढील काही दिवस अतिवृष्टी आणि स्थानिक पूरसदृश परिस्थितीचा धोका कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा