नाशिकच्या 'या' कंपनीनं विकला ५०० टन शेतमाल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह ऑनलाईन बाजारपेठेला मर्यादा आल्या असताना नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं महिनाभरात सुमारे ५०० टन भाजीपाला व फळाची मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री केली आहे. त्यामुळे १२०० शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ३ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेप्रमाणं शहरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत राहणंही गरजेचं आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाची भाजीपाला व फळांची आठवड्याची गरज लक्षात घेऊन ६ व १० किलो वजनाचे व्हेजिटेबल बास्केट व फ्रुट बास्केट असे पर्याय तयार करण्यात आले.

महिनाभरापासून सुरू केलेल्या व्यवस्थेत ६०० गृहनिर्माण सोसायट्यांत थेट ३५ हजारांहून अधिक ग्राहकांपर्यंत ५५ हजार बास्केटद्वारे सह्याद्री कंपनीचा ४५९ टन भाजीपाला व फळे पोहोचले आहेत. २०११ ला स्थापन झालेल्या या कंपनीचे ८ हजार शेतकरी सभासद आहेत.

सुरुवातीला समाज माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवून विक्री व्यवस्था उभी करण्यात आली. त्यानंतर किरकोळ विक्रीसाठी वेबसाईट तयार करून गृहनिर्माण सोसायटीनिहाय आॅनलाईन विक्री व्यवस्था उभारण्यात आली. मोबाइल एप्लिकेशनचीही मदत घेण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या