ब्रँण्डनेम फक्त नावालाच? मॅक्डाॅनल्डमध्येही बनतात अस्वच्छ पदार्थ, एफडीएने केली कारवाई

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मॅक्डाॅनल्ड म्हटलं की बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोकफ्लोट डोळ्यासमोर येतो नि या पदार्थांची चव चाखायला आपोआप लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच पावलं 'मॅक डी'च्या दिशेनं वळतात. मॅक्डाॅनल्ड हे मोठं ब्रॅण्डनेम असल्याने इथल्या पदार्थांवर बिनधास्त ताव मारला जातो. पण यापुढे मात्र असं करू नका कारण 'मोठा घर पोकळ वासा...' या म्हणीनुसार मॅक्डाॅनल्डमध्येही अस्वच्छ जागेत अन्नपदार्थ बनवण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं असून याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने परळमधील मॅक्डाॅनल्डवर कारवाई केली आहे.

अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन

'एफडीए'च्या बृहन्मुंबई विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात लोअर परळ येथील फिनीक्स माॅलमध्ये मॅक्डाॅनल्डची फ्रेंचायजी चालवणारे मे. हार्डकॅस्टल रेस्टाॅरन्ट प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडून 'अन्न सुरक्षा मानके' कायद्याचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार परवाना दर्शनी भागात अर्थात सर्वांना दिसेल, अशा ठिकाणी लावणं बंधकारक आहे. असं असताना येथे परवाना लावलेला आढळला नाही.

काय सांगतो कायदा?

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार अन्न पदार्थ ज्या ठिकाणी शिजवले जातात तो परिसर स्वच्छ असणं बंधनकारक आहे. अन्न शिजवणारे कर्मचारीही स्वच्छ असायला हवेत. स्वच्छतेचे सर्व नियम पाळणंही आवश्यक आहे. मात्र एफडीएच्या तपासणीत मॅक्डाॅनल्डकडून हे नियम पाळेल जात नसल्याचं दिसून आलं आहे. अस्वच्छ जागेत अन्न शिजवले जात असल्याने असे अन्नपदार्थ खाणं शरिरास अपायकारक ठरू शकतं.

तर, शटर डाऊन

मॅक्डाॅनल्डकडून कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं तपासणीत निष्पन्न झाल्याने मॅक्डाॅनल्डला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शैलेश आढाव यांनी दिली. या नोटीशीनुसार १५ दिवसांत त्रुटी सुधारण्याचे आदेश मॅक्डाॅनल्डला देण्यात आले आहेत. त्यानुसार या त्रुटी दूर केल्या नाही, तर १५ दिवसांनंतर मॅक्डाॅनल्डविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही आढाव यांनी स्पष्ट केलं आहे. १५ दिवसांत त्रुटी दूर झाल्या नाही, तर मैकडोनाल्डचे शटर डाऊन करण्याचा अधिकार एफडीएला आहे. त्यामुळे आता मॅक्डाॅनल्ड त्रुटी दूर करत ग्राहकांचे हित जपते की मॅक्डाॅनल्डचं शटर डाऊन होतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.


हेही वाचा-

कफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात? एफडीए बजावणार नोटीस

विद्यार्थांनी काय खायचे, काय टाळायचे? एफडीए देणार धडे!


पुढील बातमी
इतर बातम्या