मलबार हिल टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळं दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पेडर रोडवरील म्हणजेच कमला नेहरू पार्क येथून येणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथकडून केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या एन. एस. मार्गादरम्यानची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेनंतर आता मलबार हिल टेकडी धोकादायक बनल्याचा माहिती समोर येत आहे. या टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात मंगळवार संध्याकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळं महापालिकेला टेकडीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात करावा लागला होता.

मलबार हिल टेकडीवरील कमला नेहरू पार्क येथून केम्स कॉर्नरच्या दिशेने जाणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथ येथून केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणारा एन. एस. पाटकर मार्गादरम्यान भलीमोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मलबार हिल टेकडीवरून एन. एस. पाटकर मार्गावर भूस्खलन होऊ नये यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. परंतु, ५ ऑगस्ट रोजी या भिंतीचा काही भाग कोसळला.

भिंत कोसळण्याने बी. जी. खेर मार्गावरील ७०० मीटर लांबीच्या मार्गाची वाताहत झाली. तसेच संरक्षक भिंत धोकादायक बनल्यामुळे एन. एस.पाटकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, मलबार हिल टेकडीचा हा भाग धोकादायक बनत असल्याचे निदर्शनास आल्यानं दोन्ही रस्त्यांची उभारणी कशी करायची असा प्रश्न पालिकेला पडला होता. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे.

मलबार हिल टेकडीच्या तपासणीसाठी मातीचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी या टेकडीची ड्रोनच्या साहाय्याने पाहणीही करण्यात आली. मात्र पावसामुळे टेकडी वृक्षवल्लींनी झाकली गेली आहे. त्यामुळे टेकडीची स्थिती समजू शकलेली नाही. महापालिका अधिकारी पावसाळा जाण्याची वाट पाहात आहेत. त्यानंतर युद्धपातळीवर अभ्यास करून रस्त्यांच्या बांधणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या