मुंबईस्थित आर्केड डेव्हलपर्स (Arkade Developers) कंपनी लवकरच गोरेगाव येथील प्रतिष्ठित फिल्मिस्तान स्टुडिओच्या जागेवर लक्झरी निवासी प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही जमीन पूर्वी बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या कुटुंबाची मालकी होती.
हा प्रकल्प 3, 4 आणि 5 बीएचके फ्लॅट्स तसेच पेंटहाऊसेससह सादर केला जाणार असून, 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या विकासमूल्याचा असेल, असं हिंदुस्तान टाइम्सने म्हटलं आहे.
फिल्मिस्तान स्टुडिओची स्थापना 1943 मध्ये काजोलचे आजोबा सशाधर मुखर्जी यांनी केली होती. सुमारे चार एकर पसरलेल्या या स्टुडिओत पेयिंग गेस्ट (1957), नास्तिक (1954), अनारकली (1953) आणि अलीकडील 2 स्टेट्स (2014) सारखे अनेक प्रसिद्ध चित्रपट शूट झाले.
“आमचं लक्ष्य पुढच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फिल्मिस्तान प्रकल्प सुरू करण्याचं आहे. जर तसं जमलं नाही, तर आम्ही सणासुदीच्या काळात लाँच करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे,” असं आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अमित जैन यांनी सांगितलं.
हा विकास प्रकल्प अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्ये मोडतो, ज्यात प्रशस्त 3, 4 आणि 5 बीएचके अपार्टमेंट्स आणि पेंटहाऊसेस असतील. दोन 50 मजली टॉवरमध्ये हे घरांचे संकुल उभारले जाणार आहे.
“स्टुडिओचं जुन्या इमारतींचं पाडकाम पूर्ण झालं आहे आणि त्या जागेवर लक्झरी प्रकल्प उभा राहणार आहे. सध्या यापेक्षा अधिक माहिती मी देऊ शकत नाही,” असं जैन यांनी सांगितलं.
8,000 कोटींच्या विकास पाइपलाइनचा भाग
फिल्मिस्तान प्रकल्प हा कंपनीच्या सात नव्या प्रकल्पांपैकी एक आहे, ज्यांची एकत्रित किंमत सुमारे 8,000 कोटी आहे. यात जमिनीवरील नवीन बांधकाम प्रकल्पांसोबतच रीडेव्हलपमेंट प्रकल्पांचाही समावेश आहे.
सध्या आमच्याकडे 2,000 कोटींच्या किंमतीचे सहा प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येकाचा सरासरी आकार 350 कोटी आहे.
पुढच्या टप्प्यात आम्हाला सात नवीन प्रकल्पांद्वारे 8,000 कोटींची संधी मिळणार आहे. त्यापैकी तीन आमच्या स्वतःच्या जमिनीवर आणि चार रीडेव्हलपमेंटवर आधारित आहेत,”असं जैन यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं.
हेही वाचा