एका रात्रीत आगीच्या तीन घटना, डाॅकयार्डमध्ये ७ दुकाने जळून भस्मसात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शहरातील कानाकोपऱ्यात आग लागण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. सोमवारी उशीरा रात्री मुंबईतील विविध भागांत तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यातील डाॅकयार्ड रोड येथे लागलेली आग मोठी असून या आगीत ७ दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. तर इतर दोन ठिकाणी लागलेली आग किरकोळ स्वरूपाची होती.

७ दुकाने जळून भस्मसात

डॉकयार्ड रोड येथील जमेरिया इमारतीमधील एका लोखंडाच्या वर्कशॉपला सोमवारी रात्री १२.१५ वाजता भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब आणि पाण्याचे ४ टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री २ वाजता ही आग विझवण्यात यश मिळवलं.

ही आग क्रमांक २ ची असून या आगीत इमारतीतील ७ दुकाने जळून भस्मसात झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनुग्रह हाॅटेलचं किचन खाक

तर, दुसरी आग दादरच्या अनुग्रह हाॅलेलला पहाटेच्या सुमारास लागली. या आगीत हाॅटेलचं किचन पूर्णपणे जळालं. किचनमध्ये आचारी काम करत असताना त्याच्या हातातील कपडा चुकून आगीवर ठेवलेल्या भांड्यात पडला. त्यामुळे त्या कपड्याने पेट घेतला. तो कपडा आचाऱ्याने फेकून दिला. त्यामुळे बाजूच्या धान्याला आग लागली. या आगीत संपूर्ण किचन जळून खाक झालं. मात्र या आगीत कुणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळालेली नाही.

याचप्रमाणे जुहूतील प्रसिद्ध जुहू तारा रोडवरील दिवंगत गायक किशोर कुमार यांच्या बंगल्याशेजारील सूरज को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली. ही आगही लहान असल्याने ती तात्काळ विझवण्यात आली.


हेही वाचा-

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आगीच्या ७ घटना, ५ जणांचा गेला जीव

पुढील बातमी
इतर बातम्या