कल्याण: पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानांना आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पाळीव प्राणी विकणाऱ्या दुकानांना आग लागल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेस असलेल्या रामबाग परिसरात दुकानांना आग लागली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली असून, आगीत अनेक पाळीव पक्षी, प्राणी आणि माशांचा मृत्यू झाला.

विविध पक्षी, प्राणी आणि माशांच्या विक्रीच्या दुकानांमध्ये आग लागली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. बुधवारी सकाळी ८. ३०च्या सुमारास या दुकानाना आग लागल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाला मिळली. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर पक्षी, ससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून ३ दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डस्, कबुतरे, ससे आणि शोभेच्या माशांची विक्री केली जाते. आगीमध्ये सुमारे ५० पक्षी, ७० ते ८० मासे मरण पावले असण्याची शक्यता अग्नीशमन जवानांनी व्यक्त केली.

आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षी, ससे आणि माशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही पक्षी, ससे, माशांना जीवदान दिले.

ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ठोस कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या