एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन २० हुन अनेक जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांना प्राण गमवावे लागले, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

आयसीयू वॉर्डात भीषण आग

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

डॉक्टरांनी मात्र अवघ्या २ मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. 

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत

पुढील बातमी
इतर बातम्या